*हिंदू गर्जना प्रतिष्ठान द्वारे दोन दिवसीय मर्दानी खेळांचे उन्हाळी शिबिर संपन्न*
पुसद शहरामध्ये हिंदू गर्जना प्रतिष्ठान द्वारा संचालित शिवशौर्य मर्दानी आखाडा व शौर्य आत्मरक्षा प्रशिक्षण केंद्र यांच्याद्वारे दिनांक ६ व ७जून २०२६ रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून दोन दिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये लाठीकाठी, भाला तलवारबाजी, उर्मी, मुदगल, दांडपट्टा, चक्र इत्यादी शिवकालीन शस्त्रविद्या व मर्दानी खेळांचा परिचय व प्रशिक्षण देण्यात आले.
वानरे मंगल कार्यालयाच्या भव्य सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले. वय वर्ष ८ ते १५ वर्षापर्यंतच्या ६७ मुली व ३३ मुले अशा एकूण १०० विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला. शिवकालीन शस्त्र विद्या व मर्दानी खेळांच्या शारीरिक प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना मानसिक स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी योगासने, बौद्धिक विकासासाठी संस्कृत स्तोत्र व सुभाषिते तसेच भारतीय संस्कृती, सामाजिक प्रथा, पर्यावरण, कुटुंब व्यवस्था, व्यायाम आणि मुलींकरता आत्मरक्षा या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन केले गेले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना शिवकालीन शस्त्र विद्येचे व मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी अहिल्यानगर (बीड) व अमरावती येथून प्रशिक्षक बोलविण्यात आले होते. तसेच हिंदू गर्जना प्रतिष्ठान, पुसदचे अध्यक्ष श्री सागर सुधीर सरनाईक यांचे सुद्धा मुलांना उत्तम मार्गदर्शन लाभले. सर्व प्रशिक्षकांनी अत्यंत उत्तम रीतीने मुलांना मार्गदर्शन करून त्यांची मने जिंकली.
शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमांमध्ये मुलांनी या दोन दिवसांमध्ये अवगत केलेल्या कलांचे प्रात्यक्षिक पालकांसमोर सादर केले.
भारत माता व शिवछत्रपती महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने आणि देशभक्तीपर गीताच्या गजराने आरंभ झालेल्या या शिबिराचा समारोप भारत माता आरतीने करण्यात आला. शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सर्व उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदविला तसेच शिबिराच्या शेवटी काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त करून शिबिराच्या आयोजकांचे कौतुक केले व अशा उपक्रमांची समाजात गरज असल्याचे मत व्यक्त केले.
दोन दिवसीय उन्हाळी शिबिराच्या यशस्वीते करता हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर सरनाईक, सदस्य आशिष शुक्ला, रवींद्र घड्याळे, अमोल आरगुलवार, स्वप्निल महाजन, संतोष भगत, श्रीधर सरनाईक तसेच सहकारी वासंती ताई सरनाईक, अमृता सरनाईक, अश्विन ठवकर , अभिनव बयास ,लक्ष्मण शिरडकर, पवन बोजेवार या सर्वांनी परिश्रम घेतले.

إرسال تعليق