अट्रॉसिटी व विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपींची निर्दोष मुक्तता.
विशेष खटला क्र. १५/२०१३ मधील सर्व आरोपी निर्दोष मुक्त
पुसद येथील मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय यांनी दि. २२ मे २०२६ रोजी विशेष खटला क्र. १५/२०१३ मध्ये ऐतिहासिक निकाल देत सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. तब्बल १३ वर्षे सुरू असलेल्या या प्रकरणात अखेर सत्याचा विजय झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
सदर प्रकरणामध्ये अमरसिंग कल्पनाथसिंग ठाकूर, सुनील उर्फ बाला अमरसिंग ठाकूर, सागर दिपकसिंग ठाकूर व शक्ती उर्फ सतीश अमरसिंग ठाकूर यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४, ३२३ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, दि. १६/०७/२०१२ रोजी पुसद शहरातील गांधी चौक परिसरात फिर्यादीच्या नातवास आरोपींकडून मारहाण करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी घटनास्थळी गेली. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली, विनयभंग केला तसेच धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान अभियोजन पक्षाकडून फिर्यादीसह विविध साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले.
मात्र संपूर्ण पुरावे, साक्षीदारांचे कथन, वैद्यकीय कागदपत्रे व घटनाक्रम यांचा सखोल विचार केल्यानंतर मा. न्यायालयाने अभियोजन पक्ष आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध करण्यात पूर्णतः अपयशी ठरल्याचे नमूद केले.
मा. न्यायालयाने आपल्या निकालात खालील महत्त्वपूर्ण बाबी अधोरेखित केल्या —
• फिर्यादीच्या न्यायालयातील जबाबात व प्राथमिक तक्रारीत गंभीर विसंगती आढळून आल्या.
• साक्षीदारांच्या कथनामध्ये परस्परविरोधी बाबी आढळल्या.
• वैद्यकीय पुरावे व दस्तऐवजी पुरावे आरोपांना पूर्णपणे समर्थन देत नव्हते.
• अभियोजन पक्ष आरोपींविरुद्ध शंका पलीकडे जाऊन गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरला.
या संपूर्ण प्रकरणात आरोपींच्या वतीने प्रभावी बाजू मांडत अॅड आदित्य माधवराव माने यांनी न्यायालयासमोर साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, पुराव्यातील त्रुटी, विलंबाने दाखल झालेली तक्रार तसेच अभियोजनातील गंभीर कमतरता प्रभावीपणे निदर्शनास आणून दिल्या. त्यांच्या अभ्यासपूर्ण व कायदेशीर दृष्ट्या भक्कम युक्तिवादामुळे आरोपींना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
सदर निकाल हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा असून, केवळ आरोप नव्हे तर ठोस, विश्वासार्ह व शंकातीत पुरावे आवश्यक असतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
إرسال تعليق