सौदीतून ब्लॅकमेल करणारा आरोपी मुंबईत अटकेत; खेड पोलिसांची दमदार कारवाई

 खेड: येथील पोलिसांनी सायबर ब्लॅकमेलिंग प्रकरणात मोठी कारवाई करत सौदी अरेबियामध्ये वास्तव्यास असलेल्या आरोपीला मुंबईत अटक केली आहे. या प्रकरणात आरोपीने पीडित महिलेकडून तब्बल ६८ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचे उघड झाले आहे.


खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी गुलाम मोहिद्दीन रफिक परकार (वय ३२, रा. साखरोली, ता. खेड, जि. रत्नागिरी) याने ९ सप्टेंबर २०२५ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत फिर्यादी महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ मोबाईलद्वारे काढले. त्यानंतर हे फोटो कुटुंबीयांना दाखवून व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वारंवार पैशांची मागणी केली. आरोपी त्या काळात सौदी अरेबियामध्ये राहत असताना पीडितेकडून ऑनलाईन पद्धतीने ६८ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. एवढी रक्कम दिल्यानंतरही आरोपीने पुन्हा पैशांची मागणी सुरूच ठेवली. नकार दिल्यानंतर त्याने पीडितेचे अश्लील फोटो तिच्या पतीला पाठवून मानसिक छळ केला.
दरम्यान, आरोपी जानेवारी २०२६ पासून सौदी अरेबियात नोकरीसाठी गेला होता. १८ एप्रिल २०२६ रोजी तो कामानिमित्त मुंबईत आल्याची गोपनीय माहिती खेड पोलिसांना मिळाली. तसेच त्याचे मोबाईल लोकेशनही मुंबईत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार खेड पोलिसांच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीला मुंबईतून ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने ऑनलाईन माध्यमातून खंडणी स्वीकारल्याचेही स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने आरोपीला २३ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत आरोपीकडून सुमारे ७ लाख रुपये किमतीची नेक्सॉन कार, ४० हजार रुपये किमतीचा आयफोन, ३० हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी एस२४ अल्ट्रा मोबाईल तसेच पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. जी. महामुनी व खेड उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक अहीरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक रोहीदास केंद्रे, पो.कॉ. विकास पवार, सूरज मोरे आणि चंद्रमुनी ठोके यांचा समावेश होता.
दरम्यान, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना सायबर फसवणूक व ब्लॅकमेलिंगसारख्या गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...