पुसदमध्ये वृद्धाला लुटणारा चोरटा तासाभरात गजाआड; LCB चे सहाय्यक फौजदार संतोष भोरगे यांची धडाकेबाज कामगिरी!
महाराष्ट्र बँकेतून पैसे काढून घराकडे निघालेल्या ६५ वर्षीय वृद्धाला गाठून, त्यांच्याशी झटापट करत रोकड लांबवणाऱ्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या काही वेळातच शिताफीने बेड्या ठोकल्या. पुसद शहरातील स्मार्ट बाजार परिसरात घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतानाच, LCB चे सहाय्यक फौजदार संतोष भोरगे यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि धाडसी कारवाईमुळे आरोपी गजाआड झाला आहे.
नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, लतीफ सय्यद (वय ६५, रा. राजामिया बाजार, पुसद) यांनी महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून स्वतःच्या गरजेसाठी ६५ हजार रुपये काढले होते. पैसे काढून ते आपल्या गावी जाण्यासाठी निघाले असता, एका चोरट्याने त्यांच्या हालचालींवर आधीपासूनच पाळत ठेवली होती. स्मार्ट बाजार परिसरात योग्य संधी साधून आरोपीने वृद्ध लतीफ सय्यद यांना अडवले. त्यांच्याशी जबर झटापट करत खिशात असलेली १४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
जनतेची 'बघ्याची भूमिका' दुर्दैवी!
घडलेला हा प्रकार भरदिवसा आणि गजबजलेल्या परिसरात घडला. यावेळी घटनास्थळी अनेक नागरिक उपस्थित होते. मात्र, एकाही नागरिकाने पुढे येऊन वृद्धाला मदत करण्याचे किंवा चोराला पकडण्याचे धाडस दाखवले नाही. घटनेनंतर नागरिक केवळ 'बघ्याची भूमिका' घेत उभे राहिले, ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि सामाजिक संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली.
संतोष भोरगे यांचा 'सिंघम' अंदाज; पाठलाग करून आरोपीच्या ठोकल्या मुसक्या
वृद्ध फिर्यादी लतीफ सय्यद हे घाबरलेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना, रस्त्यातच स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) कर्तव्यदक्ष सहाय्यक फौजदार संतोष भोरगे यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. भोरगे यांनी संवेदनशीलतेने वृद्धाची चौकशी केली असता घडलेला प्रकार समोर आला. चोरटा नुकताच पल्सर गाडीवरून बस स्थानक परिसराकडे पळाल्याची माहिती मिळताच, क्षणाचाही विलंब न करता संतोष भोरगे यांनी पाठलाग करून गर्दीच्या मार्गावर अत्यंत शिताफीने आणि धाडसाने आरोपीच्या गाडीला ओव्हरटेक करून त्याला ताब्यात घेतले.
८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीदरम्यान आरोपीचे नाव आनंद विलास पवार (वय २०, रा. आरसी, ता. दिग्रस, जि. यवतमाळ) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेली ₹१४,५०० रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण ₹८४,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधिकारी संतोष भोरगे यांच्या तत्परतेचे कौतुक!
यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. एकीकडे नागरिक हतबलपणे बघत राहिले असताना, दुसरीकडे LCB चे संतोष भोरगे यांनी दाखवलेले तीक्ष्ण पोलीस चातुर्य, समयसूचकता, धाडस आणि जलद निर्णयक्षमता यामुळे एका वृद्ध पीडिताला तात्काळ न्याय मिळाला. भोरगे यांच्या या कर्तव्यदक्षतेचे आणि LCB पथकाच्या धडाकेबाज कामगिरीचे सध्या संपूर्ण पुसद शहरात आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार कौतुक होत आहे.
.jpg)
.jpg)
Post a Comment