प्रक्षाळ पूजा सोहळा विदर्भाची पंढरी प्रति पंढरपूर श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद येथे संपन्न.
पुसद :- 4 ऑगस्ट 2026 रोज मंगळवारला पांडुरंगाची प्रक्षाळ पूजा संस्थांन तर्फे संपन्न झाली. आषाढी यात्रेमध्ये भाविकांना दर्शन देण्यासाठी पांडुरंग परमात्मा अहोरात्र उभेच होते. वाटपाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ असा उदार पांडुरंग भक्तासाठी उभा होता. जगामध्ये असे एकच दैवत आहे की जे आपल्या भक्तांची निरंतर वाट पाहते. या दैवताला भक्तांच्या भेटीमध्ये सहवासामध्ये खरे समाधान मिळते म्हणतात ना ‘ या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला” यासाठी देवाला झालेला शीण काढण्यासाठी देवाच्या चरणाला लिंबू साखर लावून पायाची चरण सेवा करण्यात येत असते. यामुळे देवाला आलेला थकवा कमी होतो. या पूजेमध्ये देवाला आयुर्वेदिक काढा दिला जातो त्यामुळे देवाला खूप समाधान वाटते. ही परंपरा आषाढी आणि कार्तिकी एकादशीनंतर आठ दिवसांनी ही प्रक्षाळ पूजा करून आयुर्वेदिक काढा देवाला देऊन देवाचा थकवा तसेच मंदिराची स्वच्छता केली जाते. ही प्रक्षाळ पूजा आज संस्थांन मध्ये अध्यक्ष बिपिन चिद्दरवार ,राजेन्द्र गादेवार,अशोक महाजन ,दिनेश पापिनवार तसेच महिला आणि पुरुष उत्सव समिती सदस्य यांच्या हस्ते संपन्न झाली . यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पूजेमुळे सर्व भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आरती नंतर सर्वांना प्रसाद व चहा वाटप करण्यात आला.

Post a Comment