परवानगीशिवाय स्कूल बसचा रंग व नंबर बदलून फसवणूक; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, आरोपी अटकेत.
पुसद, दि. 30 जुलै : जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता वाहनाचा रंग बदलून तसेच दुसऱ्या नोंदणीकृत वाहनाचा क्रमांक लावून स्कूल बस चालवून शासन व नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत आरोपीला अटक केली असून सुमारे 10 लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 29 जुलै 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपास करण्यात आला. तपासात अरविंद चव्हाण (वय 29, रा. अरोगाव, ता. पुसद, जि. यवतमाळ) याच्या ताब्यातील वाहनाचा मूळ पांढरा रंग बदलून पिवळा करण्यात आल्याचे तसेच त्यावर MH-04-GP-0773 हा दुसऱ्या नोंदणीकृत वाहनाचा क्रमांक लावून सदर वाहन स्कूल बस म्हणून चालविले जात असल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी वाहनाची कागदपत्रे तपासली असता आरोपीकडे वैध कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. पुढील पडताळणीत संबंधित क्रमांक दुसऱ्याच वाहनाचा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318(4) सह इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंथा (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात (मा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद. अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वात स,पो,नि निरज बांडे, पो,हे, कॉ/अमोल राठोड, स,पो,नि मुन्ना आडे, स,पो,नि संतोष भोरें, पो,हे,कॉ तेजाब राणेबांध, पो,हे,कॉ सुभाष जाधव, पोहेकॉ कृष्णा मुंडेकर, पो,हे,कॉ रमेश राठोड, पो,शि सुनील पंडाळे, चापोशि नंदीर हिसामे आणि चा,पो,शि राजेश जाधव यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.
या कारवाईमुळे बनावट पद्धतीने स्कूल बस चालवून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment