⚡ ब्रेकिंग News

प्रयोगशील शेतीत उल्लेखनीय कार्याबद्दल युवा शेतकरी निशांत विजय राऊत यांचा राज्यस्तरीय सन्मान*

 *प्रयोगशील शेतीत उल्लेखनीय कार्याबद्दल युवा शेतकरी निशांत विजय राऊत यांचा राज्यस्तरीय सन्मान*

पुसद, दि. ६ जुलै : यवतमाळ जिल्ह्यातील भोजला (ता. पुसद) येथील प्रयोगशील युवा शेतकरी निशांत विजय राऊत यांना शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल "प्रयोगशील शेतकरी पुरस्कार – २०२६" या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त स्व. वसंतराव नाईक फाऊंडेशन व कृषी विकास प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण समारंभ ४ जुलै २०२६ रोजी वसंतराव नाईक स्मृती सभागृह, वनामती, नागपूर येथे उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते निशांत राऊत यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी आमदार मा. नीलय नाईक यांच्या पुढाकारातून तसेच नितीन भुतडा, अमेय नाईक, अविनाश देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 


निशांत राऊत यांनी स्वतःची १२ एकर व बटईची ८ एकर अशी एकूण २० एकर शेती आधुनिक पद्धतीने विकसित केली आहे. केळी, टोमॅटो, पपई, हळद, टरबूज, मिरची, सोयाबीन व कापूस या विविध पिकांचे नियोजनबद्ध उत्पादन घेत त्यांनी शेतीला व्यावसायिक दृष्टिकोन दिला आहे.

केळी लागवडीत एका एकरातून सुमारे ४३,५०० किलो उत्पादन घेत त्यांनी सुमारे ₹४.३५ लाखांचे उत्पन्न मिळवले. टोमॅटो पिकातून २,२०० कॅरेट उत्पादन घेत सुमारे ₹९ लाखांचे उत्पन्न मिळवले, तर पपई लागवडीतून सुमारे ₹६ लाखांचे उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले. यावर्षी हळद पिकातही त्यांनी एका एकरातून ४२ क्विंटल सुकलेल्या हळदीचे विक्रमी उत्पादन घेत तीन एकरांत एकूण १२६ क्विंटल उत्पादनाची नोंद केली. पुढील लागवडीसाठी आवश्यक बेणे राखून ठेवूनही सुमारे ₹१७.६४ लाखांचे उत्पन्न त्यांनी मिळवले.



योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ठिबक सिंचन, बाजारपेठेचा अभ्यास आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर शेतीत यश मिळविल्याबद्दल त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर निशांत राऊत यांनी, "शेतीत यश नशिबावर मिळत नाही; ते ज्ञान, योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठेचा अभ्यास आणि प्रामाणिक कष्ट यांच्या बळावर मिळते," असा विश्वास व्यक्त केला.

त्यांच्या या यशाबद्दल परिसरातील शेतकरी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच तालुक्यातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निशांत राऊत यांचा हा सन्मान हा केवळ एका शेतकऱ्याचा गौरव नसून, प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. 




Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...