⚡ ब्रेकिंग News

जंगल सत्याग्रह स्मृती दिवस संपन्न :

 जंगल सत्याग्रह स्मृती दिवस संपन्न :

पुसद. दि.१० :


               "लोकनायक बापूजी अणे ह्यांनी जंगल सत्याग्रहसारखं महान आंदोलन करण्यासाठी आपलं पुसद निवडलं हे आपल्या बेलगव्हाण, पुसदवासियांचं भाग्यच म्हणावं लागेल." असे भावपूर्ण उदगार मा. आमदार निलय नाईक ह्यांनी काढले.वन खाते व स्व. लोकनायक बापूजी अणे स्मृती प्रतिष्ठान, पुसद "च्या वतीनं साजरा झालेल्या जंगल सत्याग्रह स्मृती दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ह्या स्थळाच्या विकासाच्या दृष्टीने कांही योजना शासनाच्या विचाराधीन आहेत आणि त्या कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत आणि लवकरच हे स्थळ विकसित होईल, असे आश्वासन नाईक ह्यांनी ह्याप्रसंगी दिले.

            ह्याच कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना उपवनसंरक्षक श्री मिश्रा ह्यांनी बापूजी अणे ह्यांच्या सत्याग्रहाचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य अधोरेखित केलं. ते म्हणाले, एव्हढा मोठा सत्याग्रह बापूजीनी केला, असंख्य सत्याग्रही त्यांच्या सोबत होते, सर्वांच्या भावना उद्दिपीत झालेल्या होत्या परंतु बापुजींच्या सांगण्यावरून सर्वांनी प्रतिकात्मक कायदेभंग म्हणून फक्त गवत कापले, जंगल तोडून राष्ट्रीय संपत्तीची हानी केली नाही. सत्याग्रहाचा हा आदर्श त्यांनी घालून दिला.

              जुलमी इंग्रजी राजवटीमध्ये सविनय कायदेभंग चळवळी अंतर्गत गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाच्या धरतीवर लोकनायक बापूजी अणे ह्यांनी १० जुलै १९३० रोजी पुसद जवळील बेलगव्हाण (धुंदी) येथे "जंगल सत्याग्रह केला होता. मिठाच्या सत्याग्रहाला म्हणावे तेव्हढे यश मिळाले नाही कारण भारताच्या कांही भागातच समुद्र आणि पर्यायाने मीठाचे उत्पादन होत होते. जंगल मात्र देशभर सर्वत्र होते आणि ब्रिटिशांचे जंगलविषयक जुलमी कायदे खूप जाचक होते. बापूजी अणे ह्यांनी ह्या सर्व गोष्टीचा विचार करून दि. १०जुलै १९३० रोजी हा सत्याग्रह केला होता. त्याची आठवण म्हणून वनखात्याच्या सहकार्याने सत्याग्रह स्मृती स्थळावर "स्व. लोकनायक बापूजी अणे स्मृती प्रतिष्ठान, पुसद "सत्याग्रह स्मृती दिवस साजरा करून जुन्या आठवणींना उजाळा देत असते.अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव शाम जोशी ह्यांनी दिली.  बापूजी अणे ह्यांचा जीवनपट त्यांनी ह्याप्रसंगी उलगडून दाखवला. आपल्या गावात स्वातंत्र्य चळवळीतलं एव्हढं मोठं कार्य झालं हे ऐकून उपस्थित भारावून गेले. उपस्थितांच्या भावना लक्षात घेऊन निलय नाईक ह्यांनी बापूजी अणे हा विषय घेऊन लवकरच एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करू असं आश्वासन दिलं.

            कार्यक्रमाला वनविभागाचे सहायक उपवनसंरक्षक श्री पद्मभूषण राजगुरू, वन परीक्षेत्र अधिकारी श्री आनंद सुरत्ने,दरोगा श्री जामकर, वनरक्षक मोहिनीताई, वनरक्षक आरतीताई, वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी, बेलगव्हाण वनसमितीचे पदाधिकारी, गावकरी, पत्रकार दिनकर गुल्हाने, अनिल चेंडकाळे, प्रकाश लामणे, ज्ञानेश्वर शिंदे तथा पुसद व परिसरातील गणमान्य विनोद जिल्हेवार, निळू पाटील, अविनाश देशमुख, अनिरुद्ध पाटील,विश्वास भवरे,रवी ग्यानचंदानी, दीपक परिहार,मुकुंद पांडे अश्विन जयस्वाल, विजय पुरोहित, आंदोलकांचे वंशज संतोष मुराई, पुंजाराव जामकर, अभाविपचे सतीश खोकले, ऋषी जोगदंडे, वैभव उबाळे,महेश काळे, सुरज कुरील, अनुलोमचे सतीश कनोजे, अनिता पाटील, रुपाली जयस्वाल, आरती ग्यानचंदानी आदि मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.

             कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रतिष्ठानचे तडसे, उबाळे, मुडाणकर, रायपूरकर, टेटर, भारत पाटील, तसेच वनविभागाचे कर्मचारी ह्यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...